home आमच्या विषयी माहिती एका दृष्टिक्षेपात योजना नोटीस फलक                                                                                                                                                                                                                                                 search

शेततळे

शेततळं :

काय आहे शेततळं?

यात आपण पावसाचे पाणी जमा करू शकतो आणि भविष्यात त्याचा वापर करू शकतो.
शेततळ्याचा प्राथमिक उद्देश आहे शेतकऱ्याच्या खरीप पिकांसाठी पाण्याचा सुरक्षित स्त्रोत निर्माण करणे. 
जमिनीच्या भू-गर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी पाणी मुरवण्याची पध्दत म्हणूनही शेततळ्याचा वापर करता येईल.
या सारख्या बांधणीमध्ये साठ लाख लिटर्स इतकं पाणी साठवता येतं.
शेततळ्यामुळे पिकाच्या गरजेच्या वेळी पाणी उपलब्ध असण्याची खात्री मिळते, ज्यामुळे चांगले उत्पादनही घेता येतं.

शेततळं कुठे बांधता येईल?

शेततळ्याचे दोन प्रकार आहेत. सामुदायिक शेततळं आणि वैयक्तिक शेततळं
सामुदायिक शेततळं हे साधारणपणे पाणलोटक्षेत्राच्या जवळ निरुपयोगी जमिनीवर किंवा नाल्याजवळील नापिक जमिनीवर खोदता येईल. 
याचा मुख्य उद्देश असेल नाल्यातले पाणी साठवणे अन्यथा जे वाहून जाईल.
साठवलेलं पाणी जमिनीत मुरेल आणि भू-गर्भातल्या पाण्याची पातळी उंचावण्यास मदत होईल.
विहिरी आणि बोअरवेल यांचे पुनर्भरण होईल, ज्यामुळे संपूर्ण समाजाला त्याचा फायदा होईल.
वैयक्तिक शेततळं हे साधारणपणे शेतकऱ्यांच्या शेताच्या हद्दीत खोदले/ बांधलं जातं.
हे त्यावेळी बांधले जाते ज्यावेळी सिंचनासाठी शेतकऱ्याकडे विहीर, बोअरवेल किंवा उपसा सिंचनाचा स्त्रोत नसेल.
अश्यावेळी तो जमिनीच्या त्या भागात शेततळं बांधेल जिथे पाण्याचे प्रवाह एकत्र वाहून येतात.
अश्या शेततळ्यामुळे त्याला त्या जमिनीवर पिक घेण्यासाठी पाण्याच्या पुरवठ्याची खात्री मिळते जी पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे पडीक राहून जाईल.
शेततळ्यासाठी जागा कशी निवडावी ?
जी जागा नाल्याच्या बाजूला आहे अश्या जागेला प्राथमिकता द्यावी.
जवळपास कुठेही नाला नसल्यास, तुमच्या शेतातून एखादा अगदी छोटा ओहोळ किंवा जलवाहिनी वहात असेल अशी जागा असू शकेल.
अशी जागा निवडण्यात यावी ज्यात ओहोळामधून वाहून येणारे सर्व पाणी सुलभतेने जमा करता येईल.
शेततळं अश्याही जागांवर बांधता येईल जिथे जवळ असलेल्या मोठ्या नाल्यातून किंवा नदीतून पाण्याची उचल करता येईल.
जमीनीची प्रत महत्वाची ठरते का?
निवडलेल्या जमिनीवरची माती सुलभतेने खोदता येत आहे याची खात्री करा.
जर जमिनीवर मुरूम किंवा कठीण खडक असेल तर जास्त खोल शेततळे खोदणे कठीण होईल आणि या शेततळ्याची साठवण क्षमता खूप कमी असेल.
गाळाची माती चिकणमाती किंवा काळी माती ही शेततळं खोदण्यासाठी उत्कृष्ट आहे.

शेततळ्याचे माप कसं / किती /काय असावं?

सरकारने शेततळ्याचे सात वेगवेगळे नमुने मंजूर केले आहेत.
सर्व प्रकारांमध्ये शेततळ्याची खोली ही तीन मीटर्स इतकी निश्चित केली आहे.
शेततळ्याची लांबी आणि रुंदी पुढील प्रमाणे वेगवेगळी असेल. १५ x १५ मीटर्स, १५ x २० मीटर्स, २० x २० मीटर्स, २० x २५ मीटर्स, २५ x २५ मीटर्स, २५ x ३० मीटर्स आणि ३० x ३० मीटर्स.
शेताची गरज आणि सरकारी योजना ज्यातून निधी प्राप्त होणार आहे या अनुसार विशिष्ट आकार निवडला जाईल.

शेततळे कसे बांधावे?

शेततळ्याचे सर्वसामान्य माप ३०x ३०x ३ मीटर्स इतके घेतले जाते.
यासाठी किमान ४४ x ४४ मीटर्स इतक्या आकाराच्या जागेची गरज आहे.
एकात एक असे तीन चौकोन चिन्हांकित करून बांधकामाची सुरुवात होईल.
सर्वात बाहेरच्या चौकोनाचे माप हे अर्थातच ४४ x ४४ मीटर्स इतके म्हणजे जागेच्या आकाराचे आहे.
३० x ३० मीटर्स आकाराचा दुसरा चौकोन आहे, जो तळ्याच्या चार बाजू चिन्हांकित करतो. 
सर्वात आतला चौकोन २४ x २४ मीटर्सचा आहे. जो तळ्याचा तळ चिन्हांकित करतो.
चौकोन कसे आखावेत?
आतले दोन चौकोन काळजीपूर्वक आखायला हवेत ज्यामुळे ते बरोबर कोनात आहेत याची खात्री मिळेल.
यासाठी प्रथम आपण दोरीने एक तळरेषा निश्चित करायची आहे जी तळ्याच्या चार बाजू पैकी एक बाजू निश्चित करेल.
दगडाचा खुणेसाठी वापर करत आपण ही दोरी या रेषेच्या शेवटी काटकोनात वळवू.
दोरीच्या या वळणाचा कोन काळजीपूर्वक सुस्थित करावा जोवर ३ x ४ x ५ मीटर्सचा त्रिकोण साधला जात नाही.
यामुळे चारही कोपरे हे हवे तसे ९० अंशाचे आहेत याची खात्री मिळेल.
ही पध्दत वापरून आपण खडूने पहिल्यांदा बाहेरचा ३० x ३० मीटर्सचा चौकोन आणि त्यानंतर आतला २४ x २४ मीटर्स चा चौकोन आखून घेवू.
चौकोन कसे खोदावे?
सर्वात आधी आतला २४ x २४ मीटर्सचा चौकोन खोदून सुरुवात करा.
हा तीन मीटर्स खोलीचा अचूक चौकोनी आकार खोदून घ्यावा.
या नंतर मशीन जमिनीच्या पातळीवर आणा आणि काळजीपूर्वक भिंती खरवडून चारही बाजुकडून तळापर्यंत उतार तयार करा. 

खोदून काढलेल्या मातीचे काय करायचे?

खोदून काढलेली माती ही शेततळ्याच्या चारही बाजूना जमा करावी.
तळ्याच्या चारही बाजूच्या आणि बांधाच्या मध्ये कुठेही वाट अथवा रिकामी जागा ठेवू नये.
या मातीच्या ढीगाची उंची २ मीटर्स आणि याची तळ बाजू ४ मीटर्स असावी.
खोदकाम योग्य पध्दतीने झालेले आहे याची खात्री कशी करता येईल?
तळ्याची लांबी रुंदी आणि खोली यांचे आकारमान योग्य मापात झाले आहे हे तपासण्यासाठी बांधाच्या लांबी आणि रुंदीचे मोजमाप करा.
ते ३४ x ३४ मीटर्स या मापात  असायला हवे.
तळ्याच्या बाजू या ३० x ३० मीटर्स आणि तळ्याच्या तळाच्या बाजूचे  माप २४ x २४ मीटर्स या मापात असावे.
उतार व्यवस्थित केले गेले आहेत हे तपासण्यासाठी कोणत्याही बाजूचे वर पासून तळापर्यंतचे  माप घ्यावे.
जर ते माप ७.१० मीटर्स इतके भरले तर याचाच अर्थ उतार हा योग्य रीतीने केला गेला आहे.

शेततळ्यामध्ये पेपरचे आच्छादन करावे का?

एकदा का तळ्याचे खोदकाम पूर्ण झाले, दोन पर्याय शक्य आहेत.
तळ्याचा प्राथमिक उद्देश जर पुनर्भरण असेल तर तळ्याच्या तळाला तसेच काहीही आच्छादन न करता सोडून द्यावे जेणेकरून पाणी जमिनीच्या भू-गर्भात झिरपेल.
हल्ली बरेचदा पाणी सुरक्षेच्या हमीसाठी शेतकरी शेततळी बांधतात.
या प्रकारच्या तळ्यांमध्ये पाणी साठून राहावे म्हणून प्लास्टिकच्या कागदाचं आच्छादन करणं गरजेचं आहे.
हा एक विशिष्ट कागद आहे ज्याची जाडी ५०० मायक्रोन इतकी असायला हवी.
हा पुरेसा टिकाऊ आणि मजबूत असायला हवा जेणे करून तो सहजरीत्या फाटणार नाही.
सरकारी मान्यता असलेल्या कंपनीने पुरवलेलाच पेपर वापरावा कारण ते ७ वर्षांची हमी/ गॅरंटी देतात.

पेपरचे आच्छादन कसे करावे?

पेपर जेंव्हा पाणी या तळ्यात शिरतं या कागदावर पाण्याचा दाब येतो.
जमिनीवरल्या अणकुचीदार किंवा दातेरी कडांच्या दगडांनी कागद फाटू शकतो.
म्हणून तळ्याचे खोदकाम पूर्ण झाल्यावर आपण प्रथम तळ्याचा पृष्ठभाग चिखलाचा चांगला थर देवून आच्छादुन टाकू. 
पेपरचे प्रत्यक्ष आच्छादन हे ती कंपनी करून देईल जी पेपरचा पुरवठा करेल.
तो खाली पकडून ठेवण्यासाठी चर खोदला गेला ज्याच्यात तो ठेवलेला राहील.
तो एका जागेवर भक्कमपणे जमिनीस पकडून स्थिर राहील यासाठी त्याच्यावर माती आणि वजनी दगड ठेवले गेले. ज्यामुळे तो जोराच्या वाऱ्यामुळे किंवा पावसामुळेही जागेवरून हलणार नाही.
जनावरे जसे की कुत्रे किंवा गाईगुरांपासूनही या कागदाला सांभाळाव लागेल. ते तळ्यात शिरून कागद हलवू शकतील किंवा फाडू शकतील.
याकरीता तळ्याच्या चारही बाजूना मजबूत कुंपण उभारावे लागेल जे या जनावरांना तळ्यापासून यशस्वीरीत्या दूर ठेवेल.

पेपर आच्छादनामध्ये शेतकऱ्याची भूमिका काय असेल?

तळ्याच्या तळावर हा पेपर अच्छादून देण्याची जबाबदारी कंपनीची असेल.
याकामी लागणारी मजूरी अंदाजपत्रकात अंतर्भूत असेल.
पेपर हा बरोबर ५०० मायक्रोन जाडीचाच आहे याची खात्री मात्र शेतकऱ्याने करून घेण गरजेचं आहे.
या कागदावर ISI चिन्ह असल्याचं आणि सरकारमान्य कंपनीकडूनच हा पुरवठा झाला असल्याबद्दलही शेतकऱ्याने तपासून घ्यावं.
पेपर सप्लायरला पेपरची पूर्ण रक्कम आधीच देवून टाकू नये.
पेपर पसरवून झाल्यानंतर जर पेपरमधून गळती होत असल्यास कंपनीकडून त्याची दुरुस्ती करवून घेणे हे तुमच्यासाठी अवघड होवून बसेल.
पेपर पसरवून झाल्यावर एका महिन्याच्या आत त्यावर पाणी जमा करणे आवश्यक आहे.
पेपर जर सूर्याच्या उन्हात पाण्याशिवाय जास्त काळ उघडा राहिला तर त्याच्या गुणवत्तेत फरक पडू शकतो.
पेपर ऑगस्ट महिन्यात, पावसाचा पहिला टप्पा पार पडल्यावर पसरवणे हे आदर्शवत असेल.
पावसाचा दुसरा टप्पा सुरु होण्याआधी तो पाण्याने भरला जाईल.
वैकल्पिकरित्या, डीजेल किंवा विजेवर चालणारा पंप वापरून पाणी उपसा करून तळ्यात भरू शकतो.
वाफेने पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने होणाऱ्या नुकसानाचे काय?
जास्त कालावधीपर्यंत जेंव्हा तळ्यात पाणी राहिल तेंव्हा बरेच पाणी हे बाष्पीभवनामुळे वाफ होईल.
हे कमी करण्याकरिता अनेक पध्दती वापरता येतील.
काही शेतकरी कोलीन नावाच्या रसायनाचा वापर करतात, पाण्याच्या पृष्ठभागावर हे रसायन तेलासारख पसरवतात.
समस्या अशी आहे की जर एखाद्याने हे रसायन वापरलं तर ते या पाण्यात मस्यशेती करू शकत नाही कारण हे रसायन माश्यांसाठी विषारी असतं. 
पाण्याचे बाष्पीभवन थांबवण्याचा दुसरा मार्ग आहे तळ्यात पक्षीपालन करणे.
तरंगत्या पृष्ठभागावर पिंजऱ्यात कोंबडीची पिल्ले ठेवल्यास त्यामुळे पाण्याला सुर्यकिरणांपासून वाचवता येईल. 
यामुळे ५०% इतकं पाणी बाष्पीभवन होण्यापासून वाचवता येईल.
पक्षांची विष्ठा पाण्यात पडेल आणि पाण्यातील मासे ते खातील.
हा एक नाविन्यपूर्वक उपाय होईल.
पक्षी पालन आणि मस्य पालनापासून शेतकऱ्याला चांगली मिळकत तर मिळेलच पण विष्ठामिश्रीत पाण्यामुळे पाणी पोषकतत्वयुक्त होईल आणि पिकांसाठी ते आदर्शवत असेल.

श्रमदानासाठी सरकारच्या काय योजना आहेत?

शेततळ्यासाठी निधीपुरवठा करणाऱ्या तीन सरकारी योजना आहेत.
यातली पहिली योजना आहे ‘मनरेगा’,  ज्यात फक्त शेततळे खोदण्याचा खर्च भरून मिळतो.
या योजने अंतर्गत पहिले एक मीटर पर्यंतचे खोदकाम हे हाताने करणे अनिवार्य आहे.
खडकाळ जमीन किंवा कठीण जमिनीमुळे जर हे शक्य झाले नाही तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
दुसरी योजना आहे ‘मागेल त्याला शेततळं योजना’
यात तुम्हाला यंत्राद्वारे काम करण्याची परवानगी आहे आणि रुपये पन्नास हजार इतकी सबसिडी दिली जाते.
शेततळं खोदण्यासाठी प्रत्यक्ष खर्च चाळीस ते पन्नास हजार इतका येतो
म्हणून उरलेली चाळीस ते पन्नास हजारांची रक्कम शेतकऱ्याला स्वतःला खर्च करावी लागेल.
नॅशनल हॉर्टीकल्चर मिशनच्या अंतर्गत ही तिसरी योजना आहे जी शेततळ्यासाठी निधी पुरवते.
या योजने अंतर्गत अर्धे खोदलेले तळे हे मान्यताप्राप्त डिझाईन आहे.
या नमुन्यामध्ये तळे जमिनीत दोन मीटर खोल खोदले जाते आणि खोदलेल्या मातीचा अधिकचा तीन मीटर उंच ढीग लावला जातो.
या योजनेत १००टक्के निधी पुरवठा होतो, यात खोदकाम, पेपरचा खर्च आणि कुंपणखर्च अंतर्भूत आहे.
पण या योजनेची अट अशी आहे की हे शेततळे सामुदायिक तळे असावे.
एकट्या शेतकऱ्याला या योजनेमधून निधी मिळत नाही. कमीत कमी दोन किंवा अधिक शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करावा.
दुसरी अट अशी की तळ्याच्या पाण्यातून सिंचन केलेल्या जमिनीत शेतकऱ्याने फलोत्पादन, भाज्या किंवा फुलांची रोपांची लागवड करावी.
या दोन्ही अटी पूर्ण झाल्यास पाच लाख छप्पन्न हजार इतकी रक्कम ४४ x ४४ x ५ मीटर इतक्या आकाराचे तळे बांधण्यासाठी मिळते.

शेततळ्यात साठवलेले पाणी कसे वापरले जाऊ शकेल?

शेततळं हे शेतापेक्षा उंच भागात असेल तर पाणी हाताने सायफन पद्धतीने वापरात आणले जाऊ शकते.
जर तुमचे शेततळं हे तुमच्या शेतापेक्षा खालच्या पातळीत असेल तर तुम्हाला विजेवर चालणारा किंवा डीजेल पंप वापरावा लागेल.
लक्षात ठेवा शेततळ्यातील पाणी हे मर्यादित आहे आणि त्याचा वापर संरक्षित सिंचन म्हणून व्हायला हवा.
कमी पाण्याची गरज असणारे फलोत्पादन लागवड, भाज्या आणि फुलशेतीला प्राधान्य दिला गेला पाहिजे.
सिंचन हे ठिबक सिंचन पध्दतीने केले जावे ज्यामुळे पाण्याचा वापर जास्त कार्यक्षमतेने होईल.
दुष्काळावर उपाय म्हणून जास्तीत जास्त शेतकरी हे शेततळे बांधत आहेत.
तुम्ही निधीकरिता सरकारी योजनांचा लाभ घेतल्यास शेततळ्या सारखी रचना कमीत कमी खर्चात बांधून होईल.
जेंव्हा पाउस चुकारपणा करेल तेंव्हा सच्च्या मित्राप्रमाणे शेततळे शेतकऱ्यांच्या मदतीस येईल.
तो या शेततळ्यावर अवलंबून राहू शकतो की त्याचे पिक कधीही वाया जाणार नाही आणि तो त्याच्या शेतातून भरघोस पिक घेवू शकतो